वाघीरे विद्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न

देशभक्तीचा उत्साह आणि राष्ट्रप्रेमाची भावना जागवत विद्यालयात भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. म. ए. सो. वाघीरे संकुलातील पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच इंग्लिश मिडियम विभागातील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी या सोहळ्यात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

या कार्यक्रमासाठी म. ए. सो. संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य व वाघीरे विद्यालयाच्या शाला समितीचे अध्यक्ष मा. राहुलजी मिरासदार कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.  भारतीय सैन्यदलातील निवृत्त मेजर नितीन राऊत तसेच म. ए. सो. वाघीरे ज्युनिअर कॉलेजचे सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले प्राध्यापक नामदेव कोऱ्हाळे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

इंग्लिश मिडियम विभागातील विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत व ध्वजगीत सादर करून वातावरणात देशभक्तीची उर्जा निर्माण केली. माध्यमिक विभागातील N.C.C. (आर्मी व नेव्ही)  आणि विद्यालयातील विद्यार्थ्यांचे घोषपथक यांच्या शिस्तबद्ध संचलनाने उपस्थितांची मने जिंकली.

प्राथमिक विभागाचे शिक्षक माणिक शेंडकर यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. पूर्व प्राथमिक विभागातील चिमुकल्या बालचमूने ‘नन्हा मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ’ या गीताचे सुंदर सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी  नितीन राऊत यांनी सैन्यदलातील आपल्या वीस वर्षांच्या सेवाकाळातील अनुभव कथन करत विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, देशभक्ती आणि देशसेवेची प्रेरणा जागवली.

प्राध्यापक नामदेव कोऱ्हाळे यांनी आपल्या संदेशातून विद्यार्थ्यांना स्वच्छता, देशप्रेम आणि वडीलधाऱ्यांचा मान राखण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी आपल्या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली.

या कार्यक्रमासाठी प्रशालेचे उपमुख्याध्यापक शंतनू सुरवसे, पर्यवेक्षिका अर्चना लडकत, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भाऊसाहेब बडदे , पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मेघा जांभळे आणि इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सरोज जांगडा हे मान्यवरही उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक विभागाच्या शिक्षिका सौ. अमृता जगताप यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमानंतर प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले आणि त्यानंतर या देशभक्तिपूर्ण सोहळ्याची सांगता झाली.

Scroll to Top