दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी म.ए.सो. वाघीरे विद्यालय, सासवड येथे इयत्ता सातवीतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी पर्यावरणपूरक राखी कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी आणि म ए सो बालविकास मंदिर प्रशालेत शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या राजगौरी जगताप या उपस्थित होत्या.
कलाशिक्षक उमेश पवार यांनी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणे, प्लास्टिक व थर्माकोलचा वापर टाळणे आणि ‘टाकाऊपासून टिकाऊ’ या संकल्पनेला प्रोत्साहन देणे हा कार्यशाळेचा मुख्य उद्देश सांगितला.
कार्यशाळेसाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे सर्व विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक राखी किटचे वाटप करण्यात आले होते. या किटमधील पर्यावरणाला हानी न पोहोचविणारे विविध प्रकारचे साहित्य (जसे बांबूच्या काड्या, लाकडी मणी, कागद व बिया इ.) वापरून आकर्षक राख्या तयार करण्याबाबत मार्गदर्शन राजगौरी जगताप यांनी प्रात्यक्षिकद्वारे केले.
उपमुख्याध्यापक शंतनू सुरवसे यांनी आपल्या मनोगतात ‘अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, कलागुणांना व कार्यानुभवाला चालना मिळते; पर्यावरणाला हानी न पोहोचवता नवनिर्मितीचा आनंद विद्यार्थ्यांनी अशाच विविध उपक्रमांद्वारे घ्यावा तसेच विद्यार्थ्यांसाठी निसर्गाचे रक्षण, हेच खरे रक्षाबंधन होय’ असा संदेश दिला.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वतःच्या कल्पकतेने सुंदर व आकर्षक पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी उमेश पवार,अश्विनी सावर्डेकर, चित्रा सहारे या शिक्षक-शिक्षिकांनी सहकार्य केले.



