म. ए. सो. वाघीरे विदयालयात इयत्ता 10 वी, 12 वी च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि कौतुक समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी शाला समिती अध्यक्ष श्री राहुल मिरासदार आणि शाला समितीचे महामात्र श्री सुधीर भोसले यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाळेचे माजी विद्यार्थी श्री.पांडुरंग बुधे (Production Manager, Accurate Engingeering company ) हे होते.
कार्यक्रमाची सुरवात सरस्वती पूजन, आणि स्वागत गीताने झाली. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कांबळे सर यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीविषयी माहिती दिली. श्री को-हाळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
या वर्षी शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल 100% तर 12 वी कला शाखेचा 86.66% आणि विज्ञान शाखेचा 95.23% लागला आहे.
१० वी आणि १२ वी परीक्षेत शाळेत प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांसह ९०% पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला.
प्रमुख पाहुणे श्री. पांडुरंग बुधे यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांच्या कौतुक समारंभाला माजी विद्यार्थी म्हणून बोलविणे माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे, असे सांगितले. विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक श्री. कोळंबे सर यांनी आपल्या मनोगतातून 'मोठी स्वप्नं पहा व ती सत्यात उतरविण्यासाठी अथक परिश्रम करा' हा संदेश विद्यार्थ्यांना दिला. महामात्र श्री सुधीर भोसले यांनी 'सोशल मिडीयाचा योग्य कारणासाठी वापर करा व त्यातील चांगल्या गोष्टींपासून प्रेरणा घेऊन यश संपादन करा' असे सांगितले. शाला समितीचे अध्यक्ष श्री राहुल मिरासदार यांनी 'विद्यार्थ्यांनी शाळेच्या आठवणी जपाव्यात, नवीन क्षेत्रात ज्या ठिकाणी वाव आहे त्याची माहिती घ्यावी व त्यात यश संपादन करावे' हा संदेश दिला.
कार्यक्रमासाठी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री सुरवसे तसेच विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ. लडकत व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या वरिष्ठ शिक्षिका सौ. रिकामे यांनी केले. आणि आभार श्री खैरनार यांनी मानले.
दरवर्षी आळंदीपासून पंढरपूरला जाणाऱ्या वारीतील ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी दरवर्षी विद्यालय ‘विद्यार्थी दिंडी’चे आयोजन करते.
या वर्षी सासवड येथे पालखीचे आगमन दि ११ जुलै २०२६ रोजी झाले. पालखीच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या दिंडी पथकाच्या कार्यक्रमात शाळेतील सुमारे ८० विद्यार्थ्यांनी तसेच सकाळ व दुपार विभागाच्या शिक्षकांनी सहभाग घेतला.
वारकरी वेष धारण करून, टाळांच्या तालावर संतांचे अभंग गात गात या दिंडीमध्ये विद्यार्थी सहभागी झाले. काही विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर , निवृत्तिनाथ, मुक्ताई ,आणि सोपानदेव या संतांची वेशभूषाही केली होती. ही विद्यार्थी दिंडी प्रशालेतून निघाली आणि पुणे-सासवड या पालखी महामार्गावरून सासवडकडे येणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला स्वागतासाठी सामोरी गेली.
या प्रसंगी विद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी अनुप्रिया पाडळकर हिने साक्षरता आणि सार्वजनिक स्वच्छता या विषयांवर वारकऱ्यांचे प्रबोधन करण्याकरता लिहिलेल्या पथनाट्याचे सादरीकरण इयत्ता आठवी तक्षशिला आणि नालंदा या वर्गातील अनुप्रिया पाडळकर, संस्कृती जगताप.गार्गी नाचण. कार्तिकी ठाकरे, स्वराली शिवरकर आणि जान्हवी शेंडकर या विद्यार्थिनींनी केले. या विद्यार्थिनींना विद्यालयाच्या मराठी विषयाच्या शिक्षिका सौ संगीता रिकामे आणि शिक्षक श्री सूर्यकांत खैरनार यांनी मार्गदर्शन केले होते.
दिंडीत सहभागी झालेल्या विद्यालयातील शिक्षक-शिक्षिकांनीदेखील विद्यार्थ्यांसोबत वारकरी नृत्य केले. दिंडीचे नियोजन विद्यालयातील शिक्षक श्री शिवहार लहाने श्री हिरामण सहारे , श्री शंकर विभाड इत्यादी शिक्षकांनी केले होते.
वीर बाजीप्रभू यांनी स्वराज्याकरिता दिलेल्या बलिदानाची आठवण म्हणून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे संस्थेच्या सर्व शाखांमध्ये दरवर्षी विद्यार्थ्यांची 'पावनखिंड दौड' आयोजित केली जाते.
यावर्षी दिनांक 18 जुलै रोजी ही विद्यार्थी दौड वाघीरे विद्यालयांमध्ये आयोजित करण्यात आली. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सासवड येथील श्री गुरुसेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा. कुंडलिक शंकरराव पाटोळे यांना निमंत्रित करण्यात आलेले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विद्यालयाचे महामात्र मा. सुधीर भोसले यांनी भूषविले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मा. राजेंद्र कांबळे यांनी केले. प्रमुख पाहुणे कुंडलिक पाटोळे यांनी आपल्या ओजस्वी भाषणामध्ये शिवस्वराज्याच्या अनेक शिलेदारांच्या पराक्रमाचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर जीवंत शैलीमध्ये उलगडून दाखवला. महामात्र सुधीर भोसले यांनी आपल्या मनोगतातून पावनखिंड दौड आयोजित करण्यामागचा हेतू सर्वांना स्पष्ट करून सांगितला.
पावनखिंड दौडीमध्ये इयत्ता नववीचे सर्व विद्यार्थी सहभागी झालेले होते. प्रमुख पाहुणे आणि महामात्र यांनी ध्वज दाखवून या दौडीची सुरुवात करून दिली. वाघीरे विद्यालयापासून सासवड येथील वाघ डोंगरापर्यंत धावत जाऊन या विद्यार्थ्यांनी ही दौड पूर्ण केली.
याप्रसंगी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक शंतनू सुरवसे पर्यवेक्षिका अर्चना लडकत म.ए.सो. इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका सरोज जांगडा, म. ए. सो. बालविकास मंदिरचे मुख्याध्यापक भाऊसाहेब बडदे हे मान्यवर मंचावर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक सूर्यकांत खैरनार यांनी केले. पाहुण्यांचा परिचय नरेंद्र महाजन यांनी करून दिला तर आभार प्रदर्शनाची जबाबदारी भाऊसाहेब बडदे यांनी पार पाडली.
दरवर्षी आळंदीपासून पंढरपूरला जाणाऱ्या वारीतील ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी दरवर्षी विद्यालय ‘विद्यार्थी दिंडी’चे आयोजन करते.
या वर्षी सासवड येथे पालखीचे आगमन दि ११ जुलै २०२६ रोजी झाले. पालखीच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या दिंडी पथकाच्या कार्यक्रमात शाळेतील सुमारे ८० विद्यार्थ्यांनी तसेच सकाळ व दुपार विभागाच्या शिक्षकांनी सहभाग घेतला.
वारकरी वेष धारण करून, टाळांच्या तालावर संतांचे अभंग गात गात या दिंडीमध्ये विद्यार्थी सहभागी झाले. काही विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर , निवृत्तिनाथ, मुक्ताई ,आणि सोपानदेव या संतांची वेशभूषाही केली होती. ही विद्यार्थी दिंडी प्रशालेतून निघाली आणि पुणे-सासवड या पालखी महामार्गावरून सासवडकडे येणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला स्वागतासाठी सामोरी गेली.
या प्रसंगी विद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी अनुप्रिया पाडळकर हिने साक्षरता आणि सार्वजनिक स्वच्छता या विषयांवर वारकऱ्यांचे प्रबोधन करण्याकरता लिहिलेल्या पथनाट्याचे सादरीकरण इयत्ता आठवी तक्षशिला आणि नालंदा या वर्गातील अनुप्रिया पाडळकर, संस्कृती जगताप.गार्गी नाचण. कार्तिकी ठाकरे, स्वराली शिवरकर आणि जान्हवी शेंडकर या विद्यार्थिनींनी केले. या विद्यार्थिनींना विद्यालयाच्या मराठी विषयाच्या शिक्षिका सौ संगीता रिकामे आणि शिक्षक श्री सूर्यकांत खैरनार यांनी मार्गदर्शन केले होते.
दिंडीत सहभागी झालेल्या विद्यालयातील शिक्षक-शिक्षिकांनीदेखील विद्यार्थ्यांसोबत वारकरी नृत्य केले. दिंडीचे नियोजन विद्यालयातील शिक्षक श्री शिवहार लहाने श्री हिरामण सहारे , श्री शंकर विभाड इत्यादी शिक्षकांनी केले होते.
महाराष्ट्राचे जेष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांची जयंती आज दि. २२ जुलै २०२६ रोजी विद्यालयात साजरी करण्यात आली.
तळागाळातील नेता, शिस्तबद्ध प्रशासक व धडाडीचे विकास पुरुष म्हणून त्यांची ओळख होती. ग्रामीण विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्याची प्रेरणा नव्या पिढीला देण्यासाठी आपल्या शाळेत हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इ. ७ वी तक्षशिला मधील कु.प्रणया कडू व सर्वेश गार्डी यांनी स्व.अजित पवार यांच्या जीवनावर आधारित भाषण केले.
शिक्षक मनोगतात श्री.लहाने सर यांनी अजित दादांच्या कामाची शिस्त व सचोटी याबद्दल माहिती दिली. मा.उपमुख्याध्यापक श्री.सुरवसे सर यांनी दादांच्या तीन दशकांच्या कारकीर्दीत त्यांनी केलेले विकासकार्य, कामांचे चोख नियोजन व आस्था याबाबत माहिती सांगितली.
या जयंतीमुळे विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या विकासातील एका थोर नेत्याचा आदर्श समजला.
सौ. घोलप व सौ.सहारे यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मार्गदर्शन केले.
स्वातंत्र्य लढ्यातील महान नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती आज दि. 23 जुलै 2026 रोजी विद्यालयात साजरी करण्यात आली.
"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!" हा त्यांचा सिंहनाद आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्ती जागृत करतो. नव्या पिढीला राष्ट्रभक्तीचे महत्त्व सांगण्यासाठी आपल्या शाळेत हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
५ वी बोधगया वर्गातील सुरभी खोचरे, इ. ६ वी तक्षशिला वर्गांमधील जय जगताप, सृष्टी चव्हाण तसेच कृष्णा बेंगळे यांनी लो.टिळकांच्या वेशभूषेत व खणखणीत आवाजात भाषण केले.
उपमुख्याध्यापक सुरवसे सर यांनी लोकमान्य टिळक यांचे स्वातंत्र्य लढ्यातील कार्य,निडर नेतृत्वाने आणि जनमानसातील आदरामुळे त्यांना मिळालेली 'लोकमान्य' ही पदवी, ब्रिटिश अधिकारी त्यांना "भारतीय असंतोषाचे जनक" का म्हणत अशा अनेक गोष्टींची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ६ वी तक्षशिला मधील शुभ्रा जगताप हिने केले तर आभारप्रदर्शन दूर्वा मरळ या विद्यार्थीनींने केले.
सौ. घोलप व सौ.सहारे यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मार्गदर्शन केले.
या जयंती कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या एका थोर नेत्याचा आदर्श समजला.
भारतात सर्वत्र २६ जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. आज दिनांक २७ जुलै २०२६ रोजी आपल्या प्रशालेतही हा दिवस साजरा करण्यात आला. सकाळ विभागातील विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. लहाने सर यांनी केले.
१९९९ मध्ये लडाखमधील उत्तर कारगिल जिल्ह्यातील पर्वत शिखरांवर पाकिस्तानी सैन्याने कब्जा केला. त्यांच्या ताब्यातील स्थानांवरून त्यांना हुसकावून लावण्यासाठी आपल्या जवानांनी पराक्रमाची शर्थ केली. कारगिल युद्धात पाकिस्तानवर भारताचा विजय साजरा करण्यासाठी, २६ जुलै रोजी भारतात 'कारगिल विजय दिवस' साजरा केला जातो अशी माहिती सरांनी सांगितली. यानंतर शिवम सचिन जगताप, श्रेयस सचिन वाघोले सुरभी तुकाराम खोचरे या पाचवीतील विद्यार्थ्यांनी कारगिल युद्धासंदर्भात आणखी माहिती सांगितली.
इयत्ता सातवीमधील आर्या पोमण या विद्यार्थिनीने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.विद्यार्थ्यांमध्ये देश प्रेम, भारतीय सैनिकांबद्दल अस्मिता जागृत करण्याचे काम या कार्यक्रमाने केले.कार्यक्रमाचे नियोजन महिना प्रमुख सौ.सहारे व सौ. घोलप यांनी केले होते.
दिनांक १५ जुलै २०२६ रोजी इ. ५ वी ते ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी शालेय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.
वक्तृत्व स्पर्धेसाठी इयत्ता निहाय वेगवेगळे विषय देण्यात आलेले होते.या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण सौ. गावीत, कु.न्हालवे, सौ. जगताप या शिक्षिकांनी केले. स्पर्धेचे नियोजन सौ.घोलप व सौ.सहारे यांनी केले. प्रशालेचे मा.उपमुख्याध्यापक श्री.सुरवसे सर यांच्या मार्गदर्शनानुसार स्पर्धा संपन्न झाली.
दिनांक २७ जुलै रोजी या वक्तृत्व स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे ..
इ. ५ वी
1.शिवम सचिन जगताप .. ५ वी नालंदा
2.सुरभी तुकाराम खोचरे..५ वी बोधगया
3.श्रेयस सचिन वाघोले.. ५ वी नालंदा
इ.६ वी
1.कृष्णा बेंगळे.. ६ वी तक्षशिला
2.सृष्टी चव्हाण..६ वी तक्षशिला
3.जय जगताप.. ६ वी तक्षशिला
इ.७ वी
1.तन्वी उमेश पवार.. ७ वी तक्षशिला
2.रुणल गणेश काळे.. ७ वी नालंदा
3.प्रणया गणेश कडू.. ७ वी तक्षशिला
भारतीय संस्कृतीत गुरुंना अनन्यसाधारण महत्त्व आहे. "गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु:..." या उक्तीप्रमाणे गुरुंचे ऋण फेडण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व रुजवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
शाळेचे उपमुख्याध्यापक श्री. सुरवसे सर, प्रमुख पाहुण्या सौ.किशोरी पवार ,मान्यवर शिक्षक यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली.इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी गुरुवंदना प्रार्थना सादर केली.त्यानंतर प्रांजल खैरनार हिने कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
सौ. सहारे मॅडम यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.
सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गशिक्षकांना श्रीफळ, गुलाब पुष्प,कागदी पुष्पगुच्छ भेट देऊन गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ .पवार यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतील आठवणी सांगितल्या. आपल्याच शाळेच्या माजी विद्यार्थिनी असलेल्या पवार मॅडम यांनी विद्यार्थ्यांना गुरुंच्या जीवनातील त्याग आणि समर्पण याबद्दल मार्गदर्शन केले .तसेच विद्यार्थ्यांनी भविष्यात समाजोपयोगी काम केले पाहिजे असा संदेश दिला.
इयत्ता ७ वी मधील तन्वी पवार, रुणल काळे , प्रणया कडू या विद्यार्थ्यांनी गुरुंचा महिमा आपल्या भाषणांमधून सांगितला.
प्रशालेच्या माननीय पर्यवेक्षिका सौ.लडकत मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. बोरकर अनुजा हिने कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. गुरुंच्या प्रती आदर, कृतज्ञता आणि शिस्त या मूल्यांची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली. सौ. सहारे व सौ. घोलप यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
विद्यायालयात १ ऑगस्ट २०२६ रोजी लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी यांच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशालेतील शिक्षक देशराज कोळंबे , संगीता रामदासी, संगीता रिकामे, चंद्रकांत भोकटे , सूर्यकांत खैरनार, माने.एस. ए. तसेच सेवक महादेव भांडवलकर,वैभव म्हेत्रे ,शारदा सोळंके यांनी लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन केले.
इयत्ता आठवी मधील विद्यार्थिनी अनुप्रिया पाडळकर हिने लोकमान्य टिळकांच्या 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' या सिंहगर्जनेची आठवण करून दिली. टिळकांनी केसरी या वृत्तपत्राच्या माध्यमातून पेटवलेली वैचारिक क्रांतीची ज्वाला आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून घडवून आणलेली लोकजागृती यांचे प्रभावशाली चित्र तिने आपल्या भाषणातून उभे केले.
इयत्ता आठवीतील अक्षरा उघडे या विद्यार्थिनीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा आणि त्यांच्या अजरामर साहित्याचा आढावा घेतला. 'माझी मैना गावाकडं राहिली' यासारख्या लावण्यांमधून आणि 'फकिरा' सारख्या कादंबऱ्यांमधून त्यांनी शोषित-पीडितांचे दुःख जगासमोर कसे मांडले, याचे भावपूर्ण वर्णन तिने मनोगतामध्ये केले
संगीता रिकामे यांनी आपल्या प्रबोधनामध्ये मुलांना अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या कार्याविषयीची माहिती सांगितली.लोकमान्य टिळकांचे राष्ट्रप्रेम आणि अण्णा भाऊ साठे यांची सामाजिक बांधिलकी हे आजच्या युवा पिढीसाठी प्रेरणास्थान आहे. 'या दोन्ही महापुरुषांचे विचार आत्मसात करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल' असा उपदेश त्यांनी मुलांना केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत खैरनार यांनी केले.


















