वाघीरे विद्यालयाच्या सन १९८१ च्या एस.एस.सी. बॅचचा ४५ वर्षांनंतरचा ‘स्नेहमेळावा’ रविवार, दिनांक २३ ऑगस्ट २०२६ रोजी वाजता विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला.
या स्नेहमेळाव्यासाठी १९८१ च्या बॅचमधील एकूण १८१ पैकी जवळपास ९१ माजी विद्यार्थी उपस्थित होते. यापैकी अनेक विद्यार्थी आज उच्चपदस्थ अधिकारी, व्यावसायिक आहेत तसेच राजकीय क्षेत्रातही प्रतिष्ठित पदांवर कार्यरत आहेत.
या सोहळ्याला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र कांबळे, उपमुख्याध्यापक श्री. शंतनू सुरवसे , बालविकास मंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. भाऊसाहेब बडदे, बॅचचे समन्वयक- शिक्षक श्री. श्रीपाद तुंगार , आणि श्री शंकर विभाड हे सर्वजण उपस्थित होते.
प्रशालेचे माजी मुख्याध्यापक श्री. ज्ञानेश्वर मासाळ , माजी शिक्षक श्री. श्रीकांत देशपांडे , श्री बोराडे व श्री झेंडे यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी श्री. संजय पवार यांनी केले. विद्यार्थी मनोगता मध्ये पुणे येथे स्थायिक असलेले प्रसिद्ध पत्रकार व सिने दिग्दर्शक श्रीकृष्ण देशपांडे आणि सासवडच्या माजी नगरसेविका सौ. पुष्पाताई नंदकुमार जगताप यांनी आपल्या मनोगतातून शाळेबद्दल आणि शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. म.ए.सो. वाघीरे विद्यालयाने दिलेले संस्कार व शिक्षण त्यांच्या आयुष्यात किती महत्त्वपूर्ण ठरले आणि त्यांनी आयुष्य कसे समृद्ध करून गेले, यासंबंधी भावुक मनोगत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी श्री.भाऊसाहेब बडदे , श्री. राजेंद्र कांबळे आणि श्री. शंतनू सुरवसे यांनी शाळेपुढील विविध आव्हाने, त्यांना तोंड देत सुरू असलेली वाटचाल, तसेच माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य आणि शाळेच्या होत असलेल्या प्रगतीबद्दल सविस्तर विचार मांडले. ४५ वर्षानंतरही माजी विद्यार्थ्यांनी ज्या उत्स्फूर्तपणे आणि एकजुटीने हा मेळावा आयोजित केला, त्याचे त्यांनी कौतुक केले.
हा मेळावा यशस्वी व्हावा यासाठी माजी विद्यार्थी श्री. संजय पवार, श्री संतोष आबा काकडे,श्री मोहन टिळेकर, विठ्ठलराव कोंडे, सुनील काकडे तसेच बॅचचे कॉर्डिनेटर श्री. तुंगार सर आणि इतर सहकाऱ्यांनी अत्यंत परिश्रमाने नियोजन केले होते.


