प्रशालेतील विद्यार्थ्यांची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीला (NIV) भेट

दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी  विद्यार्थ्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) च्या पुणे येथील मुख्य कार्यालयाला भेट दिली. या शैक्षणिक भेटीमध्ये  इयत्ता ९ वी ते १२ वी मधील एकूण १७ विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना “Spend One Day as a Scientist in ICMR” या थीम अंतर्गत वैज्ञानिक वातावरणाचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांच्या सोबत मार्गदर्शक शिक्षक म्हणून श्री. तुंगार  सर आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षिका कामठे मॅडम यांनी सहभाग घेतला.

भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी संस्थेतील प्रमुख शास्त्रज्ञांच्या कार्याची माहिती घेतली. संस्थेचे संचालक डॉ. नवीन कुमार, इन्फ्लुएंझा ग्रुपच्या प्रमुख डॉ. वर्षा पोतदार, एपिडेमियोलॉजी विभागातील सायंटिस्ट डॉ. अविनाश देवशटवार, बॅक्टेरियोलॉजी विभागातील सायंटिस्ट डॉ. राजलक्ष्मी विश्वनाथन, बायो-सेफ्टी समितीच्या सचिव डॉ. कविता लोले, बायोसेफ्टी समित्यांच्या अंतर्गत तज्ज्ञ डॉ. अनिता शेटे या मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

विद्यार्थ्यांनी शास्त्रज्ञांना विषाणूशास्त्र (Virology), लस निर्मिती, आजारांचे निदान आणि जैव-सुरक्षा (Biosafety) यांसारख्या विविध विषयांवर प्रश्न विचारले. शास्त्रज्ञांनीही विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचे निरसन करून त्यांना संशोधनात्मक करिअरसाठी प्रोत्साहित केले.

विद्यार्थ्यांनी एनआयव्ही मधील अत्याधुनिक प्रयोगशाळांना भेट देऊन रोग प्रादुर्भाव करणाऱ्या विविध विषाणूंच्या नमुन्यांची कशी तपासणी केली जाते, रोगजंतूंचा फैलाव कसा होतो आणि त्यावर नियंत्रण कसे मिळवले जाते याचे प्रात्यक्षिक समजून घेतले. उच्च धोक्याच्या जंतूंवर (High-risk pathogens) काम करताना पाळावयाची बायोसेफ्टी मानके आणि कार्यपद्धतीचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला.

ही भेट विद्यार्थ्यांसाठी अत्यंत ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी ठरली. यामुळे विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष वैज्ञानिक संशोधन कसे चालते हे जवळून पाहता आले आणि भविष्यात विज्ञान व आरोग्य क्षेत्रात करिअर करण्यासाठी नवी दिशा मिळाली.

Scroll to Top