भारतीय संस्कृतीत गुरुंना अनन्यसाधारण महत्त्व आहे. “गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु:…” या उक्तीप्रमाणे गुरुंचे ऋण फेडण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व रुजवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
शाळेचे उपमुख्याध्यापक श्री. सुरवसे सर, प्रमुख पाहुण्या सौ.किशोरी पवार ,मान्यवर शिक्षक यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली.इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी गुरुवंदना प्रार्थना सादर केली.त्यानंतर प्रांजल खैरनार हिने कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
सौ. सहारे मॅडम यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.
सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गशिक्षकांना श्रीफळ, गुलाब पुष्प,कागदी पुष्पगुच्छ भेट देऊन गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ .पवार यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतील आठवणी सांगितल्या. आपल्याच शाळेच्या माजी विद्यार्थिनी असलेल्या पवार मॅडम यांनी विद्यार्थ्यांना गुरुंच्या जीवनातील त्याग आणि समर्पण याबद्दल मार्गदर्शन केले .तसेच विद्यार्थ्यांनी भविष्यात समाजोपयोगी काम केले पाहिजे असा संदेश दिला.
इयत्ता ७ वी मधील तन्वी पवार, रुणल काळे , प्रणया कडू या विद्यार्थ्यांनी गुरुंचा महिमा आपल्या भाषणांमधून सांगितला.
प्रशालेच्या माननीय पर्यवेक्षिका सौ.लडकत मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. बोरकर अनुजा हिने कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. गुरुंच्या प्रती आदर, कृतज्ञता आणि शिस्त या मूल्यांची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली. सौ. सहारे व सौ. घोलप यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

