शैक्षणिक व सामाजिक योगदानाबद्दल प्रशालेचा पुरस्काराने गौरव

 

सासवड येथील ‘अजय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भव्य ‘सन्मान पुरस्कार व बक्षीस वितरण समारंभ’ आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम शनिवार, दिनांक १८ जुलै रोजी सकाळी ११.०० वाजता स्व. यशवंतराव चव्हाण सभागृह (कुंजीरवाडा मेन रोड, सासवड) येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद सासवडच्या नगराध्यक्षा मा. श्रीमती आनंदी चंदुकाका जगताप यांनी भूषवले. तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. आमदार श्री. संजय चंदुकाका जगताप, मा. आमदार श्री. अशोकभाऊ टेकवडे यांच्यासह अनेक आजी-माजी नगरसेवक व प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात म. ए. सो. चे वाघिरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सासवड या संस्थेला शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रशालेच्या वतीने दुपार विभागातील श्री. तुंगार सर आणि श्री. खैरनार सर यांनी व्यासपीठावर उपस्थित राहून अत्यंत अभिमानाने हा मानाचा पुरस्कार स्वीकारला. मान्यवरांच्या हस्ते शाल, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन प्रशालेचा गौरव करण्यात आला.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेचे प्राचार्य, शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला असून सर्वांकडून शाळेचे कौतुक होत आहे.
Scroll to Top