वाघीरे विद्यालयात ‘पावनखिंड दौडी’चे आयोजन

 

वीर बाजीप्रभू यांनी स्वराज्याकरिता दिलेल्या बलिदानाची आठवण म्हणून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे संस्थेच्या सर्व शाखांमध्ये दरवर्षी विद्यार्थ्यांची ‘पावनखिंड दौड’ आयोजित केली जाते.

यावर्षी दिनांक 18 जुलै रोजी ही विद्यार्थी दौड वाघीरे विद्यालयांमध्ये आयोजित करण्यात आली. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सासवड येथील श्री गुरुसेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा. कुंडलिक शंकरराव पाटोळे यांना निमंत्रित करण्यात आलेले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विद्यालयाचे महामात्र मा. सुधीर भोसले यांनी भूषविले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मा. राजेंद्र कांबळे यांनी केले. प्रमुख पाहुणे कुंडलिक पाटोळे यांनी आपल्या ओजस्वी भाषणामध्ये शिवस्वराज्याच्या अनेक शिलेदारांच्या पराक्रमाचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर जीवंत शैलीमध्ये उलगडून दाखवला. महामात्र सुधीर भोसले यांनी आपल्या मनोगतातून पावनखिंड दौड आयोजित करण्यामागचा हेतू सर्वांना स्पष्ट करून सांगितला.

पावनखिंड दौडीमध्ये इयत्ता नववीचे सर्व विद्यार्थी सहभागी झालेले होते. प्रमुख पाहुणे आणि महामात्र यांनी ध्वज दाखवून या दौडीची सुरुवात करून दिली. वाघीरे विद्यालयापासून सासवड येथील वाघ डोंगरापर्यंत धावत जाऊन या विद्यार्थ्यांनी ही दौड पूर्ण केली.

याप्रसंगी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक शंतनू सुरवसे पर्यवेक्षिका अर्चना लडकत म.ए.सो. इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका सरोज जांगडा, म. ए. सो. बालविकास मंदिरचे मुख्याध्यापक भाऊसाहेब बडदे हे मान्यवर मंचावर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक सूर्यकांत खैरनार यांनी केले. पाहुण्यांचा परिचय नरेंद्र महाजन यांनी करून दिला तर आभार प्रदर्शनाची जबाबदारी भाऊसाहेब बडदे यांनी पार पाडली.

Scroll to Top