म. ए. सो. वाघीरे विद्यालय, सासवड येथे इयत्ता 10 वी, 12 वी च्या विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ

म. ए. सो. वाघीरे विदयालयात इयत्ता 10 वी, 12 वी च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि कौतुक समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी शाला समिती अध्यक्ष श्री राहुल मिरासदार  आणि शाला समितीचे महामात्र श्री सुधीर भोसले यांची उपस्थिती होती.  कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाळेचे माजी विद्यार्थी श्री.पांडुरंग बुधे (Production Manager, Accurate Engingeering company ) हे होते.

कार्यक्रमाची सुरवात सरस्वती पूजन, आणि स्वागत गीताने झाली. विद्यालयाचे  मुख्याध्यापक श्री कांबळे सर यांनी आपल्या प्रास्ताविकात  विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीविषयी माहिती दिली. श्री को-हाळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

या वर्षी शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल 100%  तर 12 वी कला शाखेचा 86.66% आणि विज्ञान शाखेचा 95.23% लागला आहे.

१० वी आणि १२ वी परीक्षेत शाळेत प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांसह ९०% पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला.

प्रमुख पाहुणे श्री. पांडुरंग बुधे यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांच्या कौतुक समारंभाला माजी विद्यार्थी म्हणून बोलविणे माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे, असे सांगितले. विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक श्री. कोळंबे सर यांनी आपल्या मनोगतातून ‘मोठी स्वप्नं पहा व ती सत्यात उतरविण्यासाठी अथक परिश्रम करा’ हा संदेश विद्यार्थ्यांना दिला. महामात्र श्री सुधीर भोसले यांनी ‘सोशल मिडीयाचा योग्य कारणासाठी वापर करा व त्यातील चांगल्या गोष्टींपासून प्रेरणा घेऊन यश संपादन करा’ असे सांगितले.  शाला समितीचे अध्यक्ष श्री राहुल मिरासदार यांनी ‘विद्यार्थ्यांनी शाळेच्या आठवणी जपाव्यात, नवीन क्षेत्रात ज्या ठिकाणी वाव आहे त्याची माहिती घ्यावी व त्यात यश संपादन करावे’ हा संदेश दिला.

कार्यक्रमासाठी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री सुरवसे तसेच विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ. लडकत व्यासपीठावर  उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या वरिष्ठ शिक्षिका सौ. रिकामे यांनी केले. आणि आभार श्री खैरनार यांनी मानले.

Scroll to Top