इ.स.१८६० मध्ये आद्य क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके, लक्ष्मणराव इंदापूरकर आणि वामनराव भावे या राष्ट्रद्रष्ट्यांनीराष्ट्रीय शिक्षण देण्यासाठीपुण्या मध्ये महाराष्ट्र एजुकेशन सोसायटी हि संस्था स्थापन केली. पुण्याबाहेर ग्रामीण भागामध्ये राष्ट्रिय शिक्षणाचा प्रसार करण्याशाठी ‘संवत्सर ग्राम’म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सासवडमध्ये, संत सोपानदेवाच्या पवित्र सान्निध्यात संस्थेने २६मार्च १९०६ रोजी आपली एक शाखा सुरु केली. या शाळेचे सुरुवातीचे नावहोते ‘अॅंग्लो - व्हर्नाकुलर स्कूल,सासवड’.जुन्या पोस्टसमोरील बंगाळे वाड्यात हि शाखा सुरु झाली.
शाळेच्या स्थापनेमध्ये सरदार आबासाहेब पुरंदरे, शंकर पांडुरंग जगताप, वामनराव बंगाळे इत्यादी प्रतीष्ठ्तांनी शाळेच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला होता.
शाळेचे पहिले मुख्याध्यापक होते गुरुवर्य कृष्णाजी केशव झांबरे.सुरुवातीला तीन इयत्तांचे मिळून फक्त २५ विद्यार्थी शाळेमध्ये होते. झांबरे सरांच्या कुशल नेतृत्वाखाली शाळेची वाटचाल सुरु झाली. व्हर्नाक्युलर फायनल ला बसवलेल्या ९ विद्यार्थ्यांपैकी ८ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने शाळा सासवडवासीयांच्या कौतुकाचा विषय ठरली.
पुढे झांबरे सरांची बारामती शाखेवर बदली झाल्याने शाळेचे नेतृत्व श्री.गोपाल नारायण जोशी यांच्याकडे आले. त्यांच्या कार्यकाळात इ.५ वी चा वर्ग सुरु झाला. पण पुढे प्लेग, इन्फ़्लुएन्ज़ा, अवर्षण इ. संकटांचा सामना करावा लागून शाळेच्या विद्यार्थिसंख्येत घट झाली.
१९१८ मध्ये य. गो. जोशी यांच्या निधनामुळे पुन्हा एकदा १९१९ साली शाळेचे नेतृत्व झांबरे सरांकडे आले. उत्कृष्ट अध्यापन, लोकसंग्राहक वृत्ती या गुणांच्या जोरावर नेटाने प्रयत्न करून श्री. झांबरे सरांनी १९२३ सालापर्यंत शाळेला तिचे शैक्षणिक स्वास्थ्य पुन्हा मिळवून दिले.
१९२४ साली श्री.लक्ष्मण वामन भावे यांच्या रूपाने शाळेला पहिले पदवीधर मुख्याध्यापक लाभले. भावे यांनी शाळा अधिकाधिक समाजाभिमुख करण्याचा प्रयत्न केला. १९२५ साली कु. हेलन गायकवाड या मुलीचा प्रवेश शाळेमध्ये होऊन सासवड मध्ये स्त्रीशिक्षणाचा श्रीगणेशा झाला.
१९३२ ते १९४२ पर्यंत श्रीधर रामचंद्र ठकार या धार्मिक व मनमिळाऊ मुख्याध्यापकांनी आपल्या अंगभूत गुणांच्या जोरावर सासवडकरांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले.
१९४२ मध्ये मुख्याध्यापक म्हणून रुजू झालेल्या श्री.हरी आत्माराम उमराणीकर यांच्या कारकिर्दीत शाळेमध्ये नेत्रदीपक बदल झाला. ग्रंथालय,प्रयोगशाळा या अंगांचा विकास झाला. परंतु यासाठी पूर्वीच्या जागेतून सरदार आबासाहेब पुरंदरे यांच्या वाड्यामध्ये शाळेचे स्थलांतर करण्यात आले. १९४४ साली शाळेचे विद्यार्थी पहिल्यांदा ‘मॅट्रिक’च्या परीक्षेला बसले. १४ पैकी ९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्या काळी शाळेला मिळालेले हे मोठे यश होते.
उमराणीकर सरांनी सरदार ज्योत्याजीराव जाधवराव,सरदार बाळासाहेब पुरंदरे,श्री. निरगुडे,श्री.पवार या प्रतिष्ठितांच्या व सासवड नगरपालिकेच्या सहकार्याने शाळेची सासवडच्या सौंदर्यात भर घालणारी नवी इमारत उभी केली. सुमारे अर्धे शतक भाड्याच्या इमारतीत भरणारी हि शाळा १९५४ साली स्वतःच्या या नव्या वास्तूत आली.१९४२ नंतर ८५ इतकी विद्यार्थिसंख्या आता ६२५ पर्यंत वाढली.
१९५५ मध्ये डॉ.राजेन्द्रप्रसाद या भारताच्या राष्ट्रपतींनी शाळेला दिलेली भेट हा शाळेच्या इतिहासातील सुवर्णक्षण होता.
त्यानंतर १९६२ मध्ये श्री. काशिनाथ कृष्णाजी कुलकर्णी व १९६५ मध्ये श्री.नारायण विनायक जोशी यांच्या मुख्याध्यापक म्हणून नेमणुका झाल्या. जोशी सरांच्या कारकिर्दीत सन १९६७ मध्य माजी विद्यार्थी व मुंबई उच्च न्यायालयाचे त्यावेळचे न्यायमूर्ती बॅ.वि. म. तारकुंडे यांच्या अध्यक्षतेखाली शाळेचा हिरक महोत्सव संपन्न झाला.
सन १९७४ मध्ये पुण्यातील नागरिक यांनी शाळेला १ लक्ष रुपयांची देणगी दिल्यानंतर शाळेचे नामकरण म. ए. सो.वाघीरे विद्यालय असे करण्यात आले.
सन १९८०-८१ मुख्याध्यापिका बनलेल्या श्रीमती मंगला उकिडवे या प्रशालेच्या पहिल्या महिला मुख्याध्यापिका होत. याच वर्षी प्रशालेचा अमृतमहोत्सव साजरा झाला.
श्री. गो. वा. रानडे यांच्या कारकिर्दीत एन.सी. सी.चे नौदल पथक,श्री.कि.भा.बळी यांच्या कारकिर्दीत सुरु झालेल्या पूर्वप्राथमिक विभाग,श्री. मे.गो. गोसावी यांच्या काळातील संगणक विभाग व एन.सी. सी.च्या भूदल पथकाची सुरुवात,श्री. ज. काकडे यांच्या काळात सुरु झालेले कनिष्ठ महाविद्यालय या वाघिरे विद्यालयाच्या प्रगतीतील महत्त्वाच्या घटना.
१९६२ पासून वर्गखोल्यांच्या कमतरतेमुळे शाळा सकाळ व दुपार अशा दोन विभागात भरू लागली. शाळेची वर्वर्गखोल्यांची गरज पूर्ण करण्यासाठी मुख्य इमारतीच्या मागे १९९५ मध्ये आणखी एक भव्य इमारत उभी करण्यात आली.
गेल्या ११० वर्षांच्या कारकिर्दीत या शाळेने असंख्य नामवंत विद्यार्थी घडविले आहेत. साहित्यसम्राट प्र.के. अत्रे, सरदार बाळासाहेब पुरंदरे, भारताचे माजी सरन्यायाधीश बॅ.वि. म. तारकुंडे, महाराष्ट्राचे पहिले पोलीस महासंचालक ना. मा. कामठे, पायलट बंधू वि.श. व सु. श. महागावकर,पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.राम ताकवले,शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एम. जी.ताकवले,भारती विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.उत्तमराव भोईटे,माजी कृषिमंत्री दादा जाधवराव यांसारख्या पूर्वकालीन ख्यातनाम व्यक्तींबरोबरच अलीकडच्या काळातील आय. ए. एस. चि. विशाल सोळंकी,टी.व्ही. स्टार निलेश साबळे यांच्यापर्यंत अनेक माजी विद्यार्थ्यांनी शाळेचे नाव विविध क्षेत्रामध्ये चमकत ठेवले आहे.
सन २००६ मध्ये शाळेने आपल्या वाटचालीचे शतक पार केले. २०१६ मध्ये ११० वर्शची झालेली ही शाळा भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी करून दाखवत राहील असा आम्हाला विश्वास वाटतो.
म.ए.सो. वाघीरे विद्यालय, सासवड
विषय: शालेय इमारती
शाळेला दोन इमारती आहेत.
जुनी इमारत
दर्शनी भागातील जुन्या इमारतीचे बांधकाम १९५५ साली करण्यात आले आहे. आज तिला ६५ वर्षे झालेली आहेत.
पुरंदर तालुक्यांतील अनेक नामवंत विद्यार्थी या जुन्या इमारतीतल्या वर्गांमध्ये शिकले आहेत.
या इमारतीत एकूण २१ वर्गखोल्या असून त्यात मुख्याध्यापक कक्ष, पर्यवेक्षक कक्ष, शालेय कार्यालय, शिक्षक कक्ष, भव्य ग्रंथालय व विद्यार्थी वर्ग यासाठी वापर केला जात आहे.
दगडी बांधकामातील ही इमारत जुनी असली तरी अतिशय सुंदर आहे. आजी माजी विद्यार्थ्यांचे प्रेम जडलेली आहे.
नवी इमारत
याच इमारतीच्या मागील बाजूस माजी विद्यार्थी व सासवड मधील दानशूरांनी दिलेल्या निधीतून दोन मजली नवीन इमारत १९९५ साली तयार केलेली आहे.या इमारतीचे उद्घाटन तत्कालीन मा. शिक्षण मंत्री श्री. सुधीर जोशी यांच्या हस्ते करण्यात आले होते.
या इमारतीचा दुसऱ्या मजल्याचे काम अमेरिकेत वास्तव्यास असणारे शाळेचे माजी विद्यार्थी श्री. श्यामकांत कुलकर्णी यांनी दिलेल्या निधीतून करण्यात आले.
या इमारतीत २४ वर्ग खोल्या आहेत.सकाळ विभागातील ४ वर्ग व दुपार विभातील १ वर्ग या इमारतीत भरतो. इमारतीच्या तळमजल्यावर शाळेचे सभागृह, प्रयोग शाळा, NCC साठी वर्ग, पूर्व प्राथमिक, प्राथमिक शाळेचे वर्ग भरविले जातात.
या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर अटल लँब, सुसज्ज संगणक कक्ष, इंग्रजी माध्यमिक शाळा व वॉश रूम्स आहेत.
दुसऱ्या मजल्यावर टेक्निकल वर्ग, उच्च माध्यमिकचे वर्ग बसविले जातात तसेच विद्यार्थ्यांसाठी वॉशरूमची व्यवस्था आहे.
वाघीरे विद्यालयाच्या परिसरात म.ए.सोसायटीच्या ४ शाळांंमार्फत २५०० विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते.त्यामुळे विद्यार्थिसंख्येच्या मानाने उपलब्ध सुविधा फारच अपुऱ्या आहेत. त्यामध्ये वाढ होणे अत्यंत गरजेचे आहे.
त्या वाढवण्यासाठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी मदतीचा हात पुढे करावा असे आवाहन आम्ही करत आहोत.
या शाळेने सासवडवासीयांच्या अनेक पिढ्यांना शिक्षण देण्याचे काम ११५ वर्षे अविरत चालू ठेवले आहे. त्यांच्या पाठिंब्याने आणि मदतीने यापुढेही ते अखंड चालूच राहिल असा आत्मविश्वास आम्हाला आहे.